वर्धा – भिमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त वर्ध्यात भव्य रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक समतेचा, आत्मसन्मानाचा आणि अन्यायाविरोधातील लढ्याचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
कार्यक्रमाची माहिती:
१८१८ रोजी भिमा कोरेगाव येथे झालेल्या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ वर्धा शहरात भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय बौद्ध महासभा, बुद्ध लॉन नालवाडी आणि संघदीप शैक्षणिक व सामाजिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे.
रॅली १ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजता वर्धा येथील सिव्हिल लाईन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून सुरू होईल आणि समारोप बुद्ध लॉन, नालवाडी येथे होणार आहे. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने बौद्ध बांधव, सामाजिक कार्यकर्ते, युवक, युवती आणि महिला सहभागी होणार आहेत.
संध्याकाळी ६ वाजता बुद्ध लॉन, नालवाडी येथे ‘जल्लोष शौर्यदिनाचा’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे आपल्या गायनातून उपस्थितांना मंत्रमुग्ध करणार आहेत.
आयोजकांनी सांगितले की, भिमा कोरेगाव शौर्यदिन हा सामाजिक समतेचा, अन्यायाविरोधातील संघर्षाचा आणि आत्मसन्मानाचा प्रतीक आहे. या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत इतिहास पोहोचवणे आणि एकतेचा संदेश देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक विशाल मानकर यांनी केले आहे.




















