अमरावती

मॉर्निंग वॉकदरम्यान रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ज्येष्ठाचा मृत्यू; शहरात रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी

अखेर गोविंद पिंजरकर यांची मृत्यूशी झुंज अपयशी

अमरावती, दि. २६ : शहरातील शेगाव रोडवरील आशियाड कॉलनी परिसरात मॉर्निंग वॉकदरम्यान रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिक गोविंद पिंजरकर (वय ७५) यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे आशियाड कॉलनीसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, शहरातील वाढत्या रानडुकरांच्या उपद्रवाबाबत प्रशासनाविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

पहाटेच्या मॉर्निंग वॉकदरम्यान झाला जीवघेणा हल्ला
२४ जून रोजी पहाटे सुमारे ५.१५ वाजता गोविंद पिंजरकर हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. आशियाड कॉलनीतील विघ्नहर्ता गणपती मंदिरासमोरील मोकळ्या जागेतून अचानक आलेल्या एका रानडुकराने त्यांच्यावर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या. डुकराच्या हल्ल्यात त्यांच्या हाताचे एक बोटही तुटले होते. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

सीसीटीव्हीतील दृश्यांनी शहर हादरले
या घटनेची संपूर्ण थरारक दृश्ये परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अमरावतीकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे.

बिबट्यानंतर आता रानडुकरांचा वाढता धोका
गेल्या वर्षी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात बिबट्याचा वावर आढळला होता. त्यानंतर आशियाड कॉलनी परिसरातही बिबट्याचे दर्शन झाल्याच्या घटना घडल्या होत्या. आता याच परिसरात रानडुकरांचा वाढता वावर आणि त्यांचे हल्ले नागरिकांसाठी गंभीर धोक्याचे ठरत आहेत. नाल्यालगतच्या झुडपांमध्ये रानडुकरे मुक्तपणे फिरत असल्याने भविष्यात पुन्हा वन्य प्राण्यांचा वावर वाढण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या
गोविंद पिंजरकर यांच्या मृत्यूनंतर आशियाड कॉलनीतील नागरिकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. विघ्नहर्ता गणपती मंदिरासमोरील मोकळ्या जागेला मजबूत कंपाउंड वॉल उभारावी किंवा नाल्यावर आरसीसी बंदिस्त गटरचे बांधकाम करून वन्य प्राण्यांचा प्रवेश रोखावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. तसेच शहरातील रानडुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी महानगरपालिका व वन विभागाने संयुक्त कारवाई करावी, अशीही मागणी पुढे आली आहे.

“माझे वडील गेले, पण दुसऱ्यांच्या बाबतीत असे होऊ नये”
दिवंगत गोविंद पिंजरकर यांचे पुत्र प्रवीण गोविंद पिंजरकर यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, “माझे वडील आम्हाला सोडून गेले, पण अशा घटना पुन्हा घडू नयेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी एकटे फिरणे टाळावे आणि स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. प्रशासनानेही तातडीने ठोस उपाययोजना करून नागरिकांचे प्राण वाचवावेत.”
गोविंद पिंजरकर यांच्या निधनामुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून, रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

What's your reaction?