अमरावती (प्रतिनिधी) | राज्यातील महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे सध्या पक्षविस्ताराच्या रणनीतीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शिवसेना संघटन मजबूत करण्यासाठी शिंदे विविध पक्षांतील प्रभावी नेत्यांशी संपर्क वाढवत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ठाकरे गटातील काही खासदार आणि आमदारांशी संपर्क असल्याच्या चर्चांनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील एका महत्त्वाच्या नेत्यालाही शिंदे गटाकडून ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
आज विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी शिवसेना (शिंदे गट) कडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे. या घडामोडीनंतर शिंदे गटाची पक्षविस्ताराची मोहीम आणखी वेगाने सुरू असल्याचे बोलले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे अमरावती जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे यांनाही शिंदे गटाकडून पक्षात येण्याची ऑफर देण्यात आली आहे. संतोष महात्मे यांचा धनगर समाजात चांगला जनसंपर्क असून ग्रामीण भागात त्यांचे स्वतंत्र राजकीय वजन मानले जाते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रभावी नेत्यांना आपल्या पक्षात आणण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
संतोष महात्मे यांना यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेवर संधी मिळेल, असे आश्वासन देण्यात आल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा होती. त्यामुळे आता ते राष्ट्रवादीतच कायम राहणार की शिवसेनेत प्रवेश करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या संदर्भात संतोष महात्मे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे या चर्चेबाबत त्यांची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही.
दरम्यान, या संपूर्ण घडामोडीबाबत शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत स्तरावर कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीकडे अधिकृत घोषणेपर्यंत सावधगिरीने पाहण्याची गरज आहे. मात्र, विदर्भातील बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये या चर्चेमुळे मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, संतोष महात्मे पुढील काळात कोणता निर्णय घेतात, यावर अनेक राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत.




















