निवडणूक विशेष

अमरावतीत शिवसेनेला मोठा धक्का: युवा सेना विभागीय सचिव सागर देशमुख यांचा ‘अजित पवार’ गटात प्रवेश

अमरावती | महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच अमरावतीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. युवा सेनेचे विभागीय सचिव सागर देशमुख यांनी शिवसेनेला ‘रामराम’ ठोकत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. आमदार सुलभाताई खोडके यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शेकडो तरुण कार्यकर्त्यांच्या दमदार उपस्थितीत त्यांनी आज प्रवेश घेतला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर समीकरणे बदलली
अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सागर देशमुख यांचा निर्णय शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. युवा सेनेतील एक आक्रमक चेहरा आणि विभागीय सचिव म्हणून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी होती. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
आमदार सुलभाताई खोडके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देशमुख यांनी राष्ट्रवादीची (अजित पवार गट) घड्याळ हातावर बांधली आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे युवा वर्गाचा मोठा पाठिंबा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

“सागर देशमुख यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अमरावती विभागात अधिक बळकटी मिळेल. आगामी महानगरपालिका निवडणुकीत याचा निश्चितच सकारात्मक परिणाम दिसून येईल,” असा विश्वास यावेळी पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

देशमुख यांच्या पक्षबदलामुळे शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण असून, आता शिवसेना यावर काय प्रतिक्रिया देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अजित पवार गटाची ताकद वाढणार
अजित पवार गटाला यामुळे अमरावती विभागात एक आक्रमक आणि मजबूत युवकांचे संघटन असलेला चेहरा मिळाला असून भविष्यात राष्ट्रवादीची युवा संघटना अधिक मजबूत करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रवादीने ही खेळी केल्याचे दिसून येते. सागर देशमुख यांनी महानगरपालिका निवडणूक आणि भविष्यात मोठे राजकीय पाऊल उचलण्याच्या दृष्टीने आमदार संजय खोडके आणि सुलभा खोडके यांच्या नेतृत्वात प्रवेश घेत अनेकांना धक्का दिला आहे.

What's your reaction?