विदर्भ

बीपीएलचा बहाणा करून चौकशीपासून पळ? हिंगणा क्रीडा संकुल गैरव्यवहार प्रकरणात उपसंचालकांवर गंभीर आरोप

नागपूर : हिंगणा तालुका क्रीडा संकुलाच्या प्रशासकीय चौकशीसंबंधी माहिती अधिकारांतर्गत मागवलेल्या माहितीपासून लक्ष विचलित करण्यासाठी उपसंचालक क्रीडा, नागपूर यांनी अर्जदाराला बीपीएल व राहण्याचा अनावश्यक पुरावा मागून छळ सुरू केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते सतीश भालेराव यांनी केला आहे.

भालेराव यांनी स्पष्ट केले की ते दोन हजार तीन पासून बीपीएलधारक असून संबंधित प्रमाणपत्र व रेशनकार्ड विभागाला यापूर्वीच सादर केलेले आहे. तसेच मागील १५ वर्षांपासून माहिती अधिकारातील सर्व पत्रव्यवहार हिंगणा येथील त्याच पत्त्यावर होत आहे. तरीही अचानक “रामटेकचे रहिवासी असून हिंगण्यात राहता का?” असा प्रश्न उपस्थित करून कागदपत्र मागणे हे केवळ चौकशी टाळण्यासाठीचे बहाणेबाजीचे धोरण असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

२०२२ रोजी माननीय जिल्हाधिकारी नागपूर यांनी हिंगणा तालुका क्रीडा संकुल समितीच्या प्रशासकीय चौकशीचे आदेश उपसंचालक क्रीडा कार्यालयाला दिले होते. मात्र चार वर्ष उलटूनही चौकशी अहवाल न देणे आणि त्याऐवजी अर्जदारालाच संशयाच्या भोवऱ्यात ओढण्याचा प्रयत्न करणे हे गंभीर शासकीय निष्काळजीपणाचे लक्षण असल्याचे भालेराव यांनी म्हटले आहे.

सदर चौकशी झाल्यास क्रीडा संकुल समितीत मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे तथ्य समोर येण्याची शक्यता असून, त्याची माहिती सार्वजनिक होऊ नये व न्यायालयीन कारवाई होऊ नये या भीतीतूनच संबंधित अधिकारी अर्जदाराला नाहक त्रास देत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणात चौकशी अहवाल तातडीने जाहीर करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा न्यायालयीन लढा उभारण्याचा इशारा भालेराव यांनी दिला आहे.

What's your reaction?