अमरावती

संभाजीनगर चौकातील अनधिकृत झोपडपट्टी हटवण्याची मागणी; आयुक्तांसह महापौरांनाही निवेदन

अमरावती (विशेष प्रतिनिधी)- नवसारी प्रभागातील संभाजीनगर चौक परिसरात रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपडपट्टीविरोधात स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते वैभव बगणे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांना निवेदन देण्यात आले.

तसेच या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी यासाठी महापौर मुलचंद तेजवानी यांनाही निवेदन सादर करण्यात आल्याची माहिती बगणे यांनी दिली. प्रशासनाच्या उच्च पातळीवर हा विषय पोहोचावा आणि तातडीने ठोस निर्णय व्हावा, हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संभाजीनगर चौक येथील मुख्य रस्त्यालगत सुमारे ३० ते ४० झोपड्या अनधिकृतरीत्या उभारण्यात आल्या आहेत. संबंधित झोपड्यांमध्ये बेकायदा वीजजोड घेतल्याचेही समोर आले आहे. मात्र या ठिकाणी सांडपाणी वाहिनी नसल्याने झोपड्यांमधील मैलापाणी थेट रस्त्यावर सोडले जात आहे. त्यामुळे परिसरात असह्य दुर्गंधी पसरत असून डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

स्थानिकांच्या मते, झोपडपट्टी परिसरात वारंवार भांडणे, अवेळी मद्यप्राशन करून होणारा गोंधळ आणि धिंगाणा यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अतिक्रमण विभागाकडे अनेकदा तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने नागरिकांनी आयुक्त व महापौर यांनी स्वतः लक्ष घालून संबंधित झोपडपट्टी हटविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून या निवेदनाची दखल घेऊन संबंधित विभागाकडून लवकरच पाहणी केली जाईल, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. आता महापालिका प्रशासन या गंभीर प्रश्नावर किती वेगाने आणि प्रभावीपणे कारवाई करते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

What's your reaction?