नागपूर, ता. 24 (सतीश भालेराव) : नियती एखाद्याची किती परीक्षा घेते, याचे उत्तम उदाहरण ज्येष्ठ सायकलपटू संजय बोंगिलवार यांचे म्हणता येईल. संजय यांनी उतारवयात सायकलने भ्रमण करून देशवासियांना तंदुरुस्तीचा व निरोगी आयुष्य जगण्याचा संदेश दिला. मात्र अचानक एकेदिवशी घरी चक्कर येऊन पडल्याने ‘स्पायनल कॉर्ड’ला इजा झाल्याने चालतेफिरते संजय अंथरुणावर आले. गंभीर दुखापतीमुळे हातपायदेखील हलवू शकत नाही.
नरेंद्रनगर येथे राहणारे ६२ वर्षीय संजय बोंगिलवार यांना मधुमेह व ब्लडप्रेशरचा त्रास आहे. त्यामुळे पायी चालताना त्यांना त्रास होत होता. त्यामुळे फिट राहण्यासाठी सायकलिंग करण्याचा निर्णय घेतला. ते न चुकता रोज १० ते २० किमी सायकल चालवू लागले. याचा फायदाही त्यांना झाला. हळूहळू ते टायगर सायकलिंग ग्रुपशी जुळले. उल्लेखनीय म्हणजे त्यांच्या अर्धांगिनीही (अर्चना बोंगिलवार) चांगल्या सायकलपटू आहेत. दोघांनी ग्रुपच्या अन्य सहकाऱ्यांसोबत आतापर्यंत रामटेक, पचमढी, शेगाव, पंढरपूर, लेह-लडाख, खरडुंगला, आग्र्यापासून अगदी संत नामदेवांचे वास्तव्य राहिलेल्या पंजाबच्या घुमानपर्यंत देशभर सायकलने भ्रमण करून देशवासियांना सायकलिंग महत्त्व पटवून दिले. शिवाय तंदुरुस्तीचा संदेशही दिला.
सर्व काही ठीकठाक सुरू असताना गेल्या १४ जानेवारीला बाथरूममध्ये जाताना अचानक चक्कर येऊन ते खाली पडले. या दुर्घटनेत त्यांच्या मेंदूला इजा झाली. शिवाय पाठीची नसही डॅमेज झाली. तेव्हापासून ते अंथरुणालाच खिळून आहेत. चालू-फिरू शकत नाहीत. हात-पायदेखील हलवू शकत नाहीत. अशा कठीण परिस्थितीत गृहिणी असलेल्या अर्चना घर सांभाळून त्यांची सुसृषा करीत आहेत. डॉक्टरांनी यावर शस्त्रक्रिया हा उपाय सांगितला. पण त्यात धोका असल्याने व आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे परिवाराने त्यास नकार दिला. सद्यःस्थितीत त्या केवळ फिजिओथेरपीच करवून घेत आहेत. आपले पती या गंभीर आजारातून बाहेर पडून पुन्हा पुर्वीसारखे तंदुरुस्त व्हावे, यासाठी अर्चना यांची गेल्या महिनाभरापासून धडपड सुरू आहे.
समाजाकडून आर्थिक मदतीची आस
दुर्घटना होण्यापूर्वी संजय हे छोटी-मोठी खासगी अकाउंटिंगची कामे करून परिवाराचे पालनपोषण करीत होते. मात्र आता घरचा कर्ता माणूसच अंथरुणाला खिळून बसल्याने आमदनीच बंद झाली आहे. दररोजचे औषध पाणी व फिजिओथेरपीचा खर्च करताना परिवाराची घायतोड होत आहे. आयुष्याच्या या कठीण प्रसंगी बोंगिलवार परिवाराला आता समाजाकडून आर्थिक मदतीची आस आहे. मदतीसाठी ९८२३९५६६५७ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधता येईल.




















