विदर्भ

टीमटाळा येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर यशस्वीपणे संपन्न

बडनेरा : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारा संचालित समाजकार्य महाविद्यालय, बडनेरा यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पथकाचे सत्र 2025–26 चे विशेष शिबीर दत्तकग्राम टीमटाळा (गट ग्रामपंचायत – खिरसाना), ता. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती येथे दि. 12 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2026 या कालावधीत यशस्वीपणे पार पडले.

या शिबिरात ग्रामविकासाच्या दृष्टिकोनातून विविध महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. टीमटाळा गावात ग्रामस्वच्छता अभियान राबवून सार्वजनिक पाणवठे, नाल्या, शाळा व शाळा परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र, युटिलिटी सेंटर आदी ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. गावालगतच्या नाल्यावर जलसंधारणाच्या दृष्टीने वनराई बंधारा बांधण्यात आला. तसेच प्रभात फेरी, जनजागृतीपर गीते, घोषवाक्ये व पथनाट्यांच्या माध्यमातून संविधान जागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, महिला सशक्तिकरण, पर्यावरण संरक्षण, पाणलोट व्यवस्थापन, पडीक जमीन विकास, नशामुक्ती अभियान व शिव्यामुक्त समाज अभियान याविषयांवर प्रभावी प्रबोधन करण्यात आले.

शिबिरादरम्यान विविध रक्त तपासण्या व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराच्या पहिल्या दिवशी दि. 12 फेब्रुवारी रोजी शिबिरार्थी विद्यार्थ्यांचे दत्तकग्राम टीमटाळा येथे आगमन झाले. शिबिर स्थळाची स्वच्छता करून गावकऱ्यांशी संवाद साधण्यात आला व श्रमदान तसेच प्रकल्प कार्याचे नियोजन करण्यात आले.

दि. 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता शिबिराचे उद्घाटन प्रा. डॉ. विशाल गजभिये (रासेयो समन्वयक, अमरावती) यांच्या हस्ते झाले. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. राजकुमार दासरवाड (प्रभारी प्राचार्य, समाजकार्य महाविद्यालय, बडनेरा) होते. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच प्रा. विशाल मेश्राम, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्रीपालजी सहारे, श्री. नरेंद्र कटकतलवारे, श्री. आकाश कटकतलवारे, ग्रामविकास अधिकारी श्यामसुंदर घुगे, श्रीमती मीना मेश्रे, श्री. विनोद गोळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी प्रा. डॉ. विशाल गजभिये यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व स्पष्ट करून शिबिरार्थींना शुभेच्छा दिल्या. सरपंच प्रा. विशाल मेश्राम यांनी शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्व विकास साधावा व समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. राजकुमार दासरवाड यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीचे महत्त्व पटवून दिले.

शिबिरातील बौद्धिक सत्रांमध्ये विविध सामाजिक, आरोग्यविषयक व शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. दि. 14 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात प्रा. डॉ. मेघा कनाटे यांनी योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून योगाचे महत्त्व स्पष्ट केले. दुपारच्या सत्रात मनोज सहारे व ललिता अग्रवाल यांनी ‘थॅलेसेमिया मुक्तीकडे एक पाऊल पुढे’ या विषयावर मार्गदर्शन करून रक्तचाचण्या केल्या. तसेच इरफान काझी यांनी ‘एच.आय.व्ही./एड्स प्रतिबंधात्मक उपाय व काळजी’ या विषयावर माहिती दिली.

दि. 15 फेब्रुवारी रोजी प्रेरणा पेठे यांनी ‘व्यावसायिक प्रशिक्षणातून नोकरीच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले. सायंकाळी प्रा. नामदेव भगत यांनी ‘राष्ट्रीय सेवा योजना शिबिराची विद्यार्थ्यांच्या विकासातील भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन केले. दि. 16 फेब्रुवारी रोजी प्रा. मनोज भिष्णुरकर यांनी राष्ट्रसंतांचे शैक्षणिक योगदान स्पष्ट केले, तर आशिष धोंगडे यांनी नेतृत्व बांधणी व संविधानिक मूल्यांवर मार्गदर्शन केले. यावेळी ‘माझा कचरा – माझी जबाबदारी’ व ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले.

दि. 17 फेब्रुवारी रोजी वर्षा देशमुख व त्यांच्या सहकारी चमूने महिला सशक्तिकरणावर मार्गदर्शन केले. सायंकाळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात प्रफुल कुकडे व विजय डवरे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन व संविधान जागर विषयावर मार्गदर्शन केले. शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी सामाजिक गीते, नाटिका व नृत्य सादर करून गावकऱ्यांचे मनोरंजन व प्रबोधन केले.

दि. 18 फेब्रुवारी रोजी सरपंच प्रा. विशाल मेश्राम यांनी ‘ग्रामविकासात युवकांची भूमिका’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्याच दिवशी दुपारी राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोपीय कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. राजकुमार दासरवाड होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शुभम परडीकर व विनोद गोळे उपस्थित होते. प्रा. डॉ. शिवाजी तुप्पेकर यांनी शिबिरातील कार्याचा सविस्तर आढावा सादर केला.

दि. 19 फेब्रुवारी रोजी गावकऱ्यांचे आभार मानून शिबिराची सांगता करण्यात आली. संपूर्ण शिबिराचे नियोजन व आयोजन प्रा. डॉ. शिवाजी तुप्पेकर, प्रा. डॉ. रंजना इंगोले व प्रा. डॉ. टी. एस. राठोड यांनी केले. शिबिराच्या यशाबद्दल सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी समाधान व्यक्त करून समाजकार्य महाविद्यालय, बडनेरा व राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे अभिनंदन केले.

 

What's your reaction?