आज काही माध्यमांतून आणि राजकीय व्यासपीठांवरून बच्चू कडू यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेषतः “सत्ता असताना त्यांनी काय केले?” असा प्रश्न वारंवार विचारला जातो. मात्र हा प्रश्न विचारण्याआधी बच्चू कडू यांचा संपूर्ण प्रवास समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण बच्चू कडू हे सत्तेच्या राजकारणातून उभे राहिलेले नेतृत्व नाही, तर ते रस्त्यावरून, आंदोलनातून आणि संघर्षातून घडलेले व्यक्तिमत्त्व आहे.
मी एक कार्यकर्ता म्हणून हे ठामपणे सांगू इच्छितो की बच्चू कडू आधीपासूनच आंदोलक आहेत. मंत्रीपद, सत्ता किंवा पद यांची त्यांना कधीही गरज नव्हती. अन्यायाविरोधात आवाज उठवणे, दुर्बल घटकांच्या प्रश्नांसाठी झगडणे आणि गरज पडल्यास सत्तेलाही प्रश्न विचारणे, हीच त्यांची खरी ओळख आहे. सत्ता आली तरी आंदोलन सुटत नाही आणि सत्ता गेली तरी संघर्ष थांबत नाही, अशी भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे.
आज अचलपूर मतदारसंघातील राजकीय वास्तव पाहिले तर अनेक प्रश्न उपस्थित होतात. निवडून आलेल्या आमदारांना मिळालेली मते ही विरोधकांच्या एकत्रित मतांपेक्षा कमी आहेत, हे कोणीही नाकारू शकत नाही. याचा अर्थ असा की जनतेने सत्ताधाऱ्यांना निर्विवाद पाठिंबा दिलेला नाही. उलटपक्षी, जनतेत मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे आणि तो रोष मतदानातून स्पष्टपणे व्यक्त झालेला आहे. त्यामुळे हा विजय विकासाचा कौल आहे असे म्हणणे हे वस्तुस्थितीशी प्रामाणिक ठरणार नाही.
मेळघाट, अचलपूर आणि आदिवासी भागातील जनता आजही मूलभूत सुविधांसाठी झगडते आहे. शिक्षणाच्या सोयी अपुऱ्या आहेत, आरोग्यसेवा तोकड्या आहेत, रोजगाराच्या संधी मर्यादित आहेत आणि अनेक योजना केवळ कागदावरच दिसतात. या परिस्थितीसाठी जर कोणी जबाबदार असेल तर ते अनेक वर्षे सत्तेत असलेले लोक आहेत. आंदोलकांवर, संघर्ष करणाऱ्यांवर किंवा जनतेचा आवाज बनलेल्या नेतृत्वावर दोष ढकलणे सोपे आहे, पण ते न्याय्य नाही.
बच्चू कडू यांचा संघर्ष हा सत्तेसाठी नसून व्यवस्थेविरोधात आहे, हे वारंवार त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. मंत्री असताना देखील त्यांनी प्रश्न विचारले, रस्त्यावर उतरले आणि जनतेच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे “तेव्हा काय केले?” असा प्रश्न विचारणाऱ्यांनी स्वतःच्या सत्ताकाळात जनतेसाठी काय केले, याचा हिशेब आधी द्यायला हवा.
आज जर आंदोलन होत असतील, पदयात्रा निघत असतील आणि सरकारविरोधात आवाज उठत असेल, तर ते कुणाच्या राजकीय स्वार्थासाठी नाही, तर जनतेच्या असंतोषातून आहे. हा असंतोष भाजपविरोधात आहे, हे निकालातून आणि जमिनीवरच्या वास्तवातून स्पष्टपणे दिसते. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी आत्मपरीक्षण करणे अधिक गरजेचे आहे.
एक कार्यकर्ता म्हणून माझे मत स्पष्ट आहे की जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश आले असल्यास त्याची जबाबदारी स्वीकारणे हे राजकीय प्रामाणिकपणाचे लक्षण असते. आज मेळघाट आणि अचलपूरमधील जनतेत जी नाराजी आहे, ती दुर्लक्षित करून चालणार नाही. म्हणूनच भाजपने जनतेची माफी मागावी, अशीच भावना अनेक सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात आहे.
हा लेख कोणत्याही नेत्याच्या वतीने नाही, तर जनतेत राहून काम करणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या भावना व्यक्त करणारा आहे. संघर्ष थांबणार नाही, कारण प्रश्न अजूनही जिवंत आहेत आणि जोपर्यंत प्रश्न आहेत, तोपर्यंत बच्चू कडूंसारख आंदोलक नेतृत्व जनतेसोबत उभे राहणारच, हीच सत्याची बाजू आहे.
-राजेश सोलव




















