अमरावती : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळांतर्गत मेळघाटातील चुर्णी येथे सुरू असलेल्या मका खरेदी केंद्रावर मागील काही दिवसांपासून अचानक मका खरेदी बंद करण्यात आल्याने आदिवासी व शेतकरी बांधवांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. शेतकऱ्यांचा मका शेतात व गोदामात पडून असताना खरेदी थांबल्याने आर्थिक अडचणी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मेळघाटातील काही शेतकरी व आदिवासी बांधवांनी थेट प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.
शेतकऱ्यांची अवस्था समजताच बच्चू कडूंनी तात्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी संबंधित विभागाचे मंत्री, सचिव, उपसचिव, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी थेट संपर्क साधून मका खरेदी त्वरित सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा स्पष्ट ईशारा दिला. बच्चू कडूंच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली.

या ईशाऱ्यानंतर अवघ्या एकाच दिवसात प्रशासनाने माघार घेत मका खरेदीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला. मेळघाट विभागासाठी तब्बल १ लाख ५० हजार क्विंटल मका खरेदीचे अतिरिक्त उद्दिष्ट मंजूर करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना दिलासा देत मका खरेदीची अंतिम मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
मका खरेदी केंद्र पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती मिळताच मेळघाटातील शेतकरी व आदिवासी बांधवांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. वेळेवर हस्तक्षेप झाल्याने मोठे नुकसान टळले असून बच्चू कडूंच्या ठाम भूमिकेमुळेच हा निर्णय शक्य झाला, अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.
बच्चू कडूंनी देखील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा सुरूच राहील, असा इशारा प्रशासनाला दिला आहे.




















