विदर्भ

प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये ‘छत्रपती संभाजी महाराज’ आंतरशालेय बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात संपन्न

नागपूर (सतिश भालेराव) | सी.पी. अँड बेरार एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित प्रहार मिलिटरी स्कूल, रवी नगर, नागपूर येथे दिनांक १७ व १८ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेली ‘छत्रपती संभाजी महाराज’ आंतरशालेय मुला-मुलींची बॉक्सिंग चॅम्पियनशिप अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध व खेळाडूवृत्तीच्या वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.

या स्पर्धेत नागपूर व परिसरातील विविध शाळांमधील एकूण ८० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. कब (२०१६-१७), कॅडेट (२०१४-१५) आणि सब-ज्युनियर (२०१२-१३) या वयोगटांतील मुला-मुलींमध्ये विविध वजनगटांनुसार चुरशीचे सामने खेळविण्यात आले. प्रत्येक सामना व्यावसायिक व अनुभवी पंचांच्या देखरेखीखाली, तसेच आवश्यक सर्व सुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे राबवून घेण्यात आला.

स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी आपले उत्कृष्ट बॉक्सिंग कौशल्य, जिद्द, चिकाटी आणि क्रीडाभावना यांचे प्रभावी दर्शन घडवले. काही सामने अत्यंत अटीतटीचे ठरले, ज्यामुळे प्रेक्षकांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला. खेळाडूंच्या कामगिरीने उपस्थित मान्यवरांची विशेष दाद मिळवली.

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना प्रमुख अतिथी अरुण बुटे यांच्या हस्ते पदके, ट्रॉफी व प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट व सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूस ‘बेस्ट बॉक्सर’ हा विशेष पुरस्कार देण्यात आला.

उद्घाटन समारंभाच्या वेळी महाराष्ट्र शासन सर्टिफाइड एन.आय.एस. बॉक्सिंग कोच गणेश पुरोहित, नामांकित बॉक्सर सुदीप शेंडे तसेच ब्रिगेडियर गावपांडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे खेळाडूंमध्ये आत्मविश्वास अधिक वाढल्याचे दिसून आले.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड. अशोक बनसोड, उपाध्यक्ष भालचंद्र कागभट व सचिव विजय कागभट यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या प्राचार्या श्रीमती वंदना कुलकर्णी यांच्या कुशल नियोजन, प्रभावी नेतृत्व व व्यवस्थापनामुळे संपूर्ण स्पर्धा अत्यंत सुरळीत पार पडली.

बॉक्सिंग कोच लावांशू खडतकर तसेच बॉक्सील प्रो बॉक्सिंग क्लब यांच्या सहकार्याने स्पर्धेचे तांत्रिक व नियोजनात्मक व्यवस्थापन उत्कृष्टरीत्या करण्यात आले. शिक्षकवृंद व शालेय कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त, नेतृत्वगुण आणि क्रीडाभावना अधिक दृढ झाली असून, प्रहार मिलिटरी स्कूल, रवी नगर यांनी क्रीडा क्षेत्रातील आपली वेगळी व भक्कम ओळख पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

What's your reaction?