नाशिक | सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेले तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिकमधील एकनिष्ठ कार्यकर्ते सचिन अहीरे यांनी आज पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केल्याची घोषणा केली आहे. याबाबतची पोस्ट त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
सचिन अहीरे हे नाशिक महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक ३ मधून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र पक्षाकडून त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी नाशिकमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपली दखल घेतली नाही, त्यामुळे आपल्यावर घोर अन्याय झाल्याचा आरोप केला आहे.

अहीरे यांनी दीर्घकाळ पक्षासाठी काम केल्याचा उल्लेख करत, मेहनत आणि निष्ठेचे योग्य मूल्यमापन न झाल्याची खंत व्यक्त केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे नाशिकमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, सचिन अहीरे पुढील राजकीय वाटचाल कोणत्या दिशेने करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




















