अमरावती

शिराळा गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बॅनरवर गुटखा थुंकल्याची घटना उघड; तणावपूर्ण वातावरण

अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या शिराळा गावात मंगळवार, दिनांक २३ रोजी धक्कादायक घटना उघडकीस आली. शिराळा गावातील मुख्य बसस्टँड चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवर अज्ञात व्यक्तीने गुटखा खाऊन थुंकल्याचा प्रकार समोर आला आहे.

ही बाब लक्षात येताच गावातील बौद्ध धर्मीय समाज बांधवांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली. त्यांनी तात्काळ वलगाव पोलीस स्टेशन गाठून घडलेला प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. घटनेचे गांभीर्य ओळखून वलगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व संबंधित बॅनर काढून टाकण्यात आला.

या घटनेनंतर काही काळासाठी शिराळा गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र वलगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार वैभव पानसरे यांनी प्रसंगावधान राखत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. त्यांनी बौद्ध धर्मीय समाज बांधवांशी संवाद साधून त्यांची समजूत काढली व अज्ञात आरोपीला लवकरच अटक करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

सर्व धर्म समभावाची भावना जपत बौद्ध समाज बांधव व गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत शिराळा गावातील मुख्य बसस्टँड चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचा दूधअभिषेक करण्यात आला.

दरम्यान, वलगाव पोलिसांनी बॅनरवर थुंकणाऱ्या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वलगाव पोलीस करीत आहेत.

What's your reaction?