अमरावती

शिराळा गावात घरफोडीचा दरोडा; एक लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास

अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिराळा गावात घरफोडीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्या चांदीसह रोख रक्कम असा एकूण एक लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

शिराळा येथील रहिवासी रमन भागीरथ नावंदर वय ६३ हे दिनांक ३ डिसेंबर रोजी पत्नी व मुलाबाळांसह शिर्डी येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते. घराला कुलूप लावून गेलेले नावंदर कुटुंब दिनांक १० डिसेंबर बुधवार रोजी घरी परतले असता घराचे मुख्य दरवाजे व आलमारीचे लॉक तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. तसेच घरातील वस्तूंची मोठ्या प्रमाणात नासधूस झाल्याचे दिसून आले.

ही बाब लक्षात येताच घरमालकांनी तात्काळ वलगाव पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वलगाव पोलीस डॉग स्क्वॉड व फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून संपूर्ण घराची पाहणी करण्यात आली.

नावंदर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चोरट्यांनी घरातून सोनं चांदी व रोख रक्कम असा एकूण एक लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. फिंगरप्रिंट तज्ञांनी दरवाज्यावरील ठसे तसेच इतर महत्त्वाचे नमुने घटनास्थळावरून हस्तगत केले आहेत.

सध्या वलगाव पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून तसेच मोबाईल लोकेशनच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम ३०५ व ३३१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घरफोडीच्या घटनेमुळे संपूर्ण शिराळा गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वलगाव पोलीस करीत असून चोरट्यांना लवकर अटक होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

What's your reaction?