अमरावती : भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी हिंदू बांधवांनी किमान तीन ते चार मुले जन्माला घालावीत, असा सल्ला दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हे वक्तव्य त्यांनी एका मौलानाच्या विधानाच्या संदर्भात केले असून, त्यामुळे लोकसंख्या आणि धार्मिक संतुलनावरून नवीन वाद निर्माण झाला आहे.
नवनीत राणा यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, काही लोक मोठ्या संख्येने मुले जन्माला घालून हिंदुस्थानला पाकिस्तान बनवू इच्छितात. एका मौलानाने चार बायका आणि १९ मुले असल्याचे सांगितले होते, त्यावरून हिंदूंनीही एका मुलावर समाधान न मानता किमान तीन ते चार मुले जन्माला घालावीत, असा आग्रह त्यांनी धरला. हे वक्तव्य अमरावतीत माध्यमांशी संवाद साधताना केले गेले.
या वक्तव्याला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावरून खोचक आणि परखड प्रत्युत्तर दिले आहे. सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटले आहे :
अतिशय चांगला विचार आहे. शुभस्य शिघ्रम, याची सुरुवात नवनीत राणा यांनी स्वतःपासून करायला हवी. पण डोहाळजेवणाची जबाबदारी मात्र माझी आणि यशोमती ठाकूर ताईंची आहे. आफ्टर ऑल लाडक्या भावजयीचे लाड आम्ही नाही पुरवायचे तर कोण?
सुषमा अंधारे यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात टोलेबाजीला आणखी धार आली आहे. नवनीत राणा यांना ‘भावजय’ म्हणत त्यांनी वैयक्तिक पातळीवरही टोला लगावला असून, त्यांनी स्वतःपासून अधिक मुले जन्माला घालण्याची सुरुवात करावी, असा उपहासात्मक सल्ला दिला आहे.
या प्रकरणामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून, विविध राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येत आहेत. लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.




















