अमरावती : शेतकरी, दिव्यांग आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमीच आक्रमक भुमिका घेणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्यास सज्ज झाले आहेत. विधानसभेतील पराभवानंतरही त्यांची लढाऊ वृत्ती कमी झाली नाही, उलट ते यापेक्षाही अधिक जोमाने सरकारविरोधी झुंज छेडताना दिसत आहेत.
मागील ३८ दिवसांपासून बच्चू कडू महाराष्ट्रभर दौऱ्यावर आहेत. या काळात त्यांनी तब्बल २४ जिल्ह्यांचा प्रवास करून ५४३७ किलोमीटर अंतर पार केलं, आणि ८२ सभा घेतल्या. त्यांच्या या दौऱ्यात जवळपास ९ लाख शेतकरी व दिव्यांग बांधवांशी थेट संवाद साधण्यात आला. ग्रामीण भागात त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून, जनतेत नव्या उत्साहाची लाट पाहायला मिळते आहे.
या दौऱ्यानंतर बच्चू कडूंच्या आक्रमक भुमिकेमुळे राज्य सरकारचे धाबे दणाणले आहेत. त्यांच्या वाढत्या प्रभावामुळेच सरकारमधील काही वरीष्ठ नेत्यांनी स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांना कडूंविरोधात बोलण्यासाठी भाग पाडल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, बच्चू कडूंनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की —
“आता कुठलीही तडजोड नाही. संपूर्ण कर्जमाफीशिवाय आम्ही माघार घेणार नाही!”
या ठाम भूमिकेसह बच्चू कडू आणि त्यांचे हजारो शेतकरी समर्थक २८ ऑक्टोबर रोजी नागपूर गाठणार आहेत. हा एल्गार मोर्चा शेतकऱ्यांच्या न्यायाच्या लढ्याचा निर्णायक टप्पा ठरणार असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, सरकार या आंदोलनाला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस यंत्रणा, प्रशासन आणि राजकीय युतीतील नेते यांच्यात हालचाली सुरू झाल्या आहेत. परंतु बच्चू कडूंचे समर्थक म्हणतात —
“आमचा लढा शेतकऱ्यांसाठी आहे, सरकार काहीही केले तरी २८ तारखेला आम्ही नागपूरला पोहोचणारच!”
राजकीय पातळीवर बच्चू कडूंचा हा एल्गार महाराष्ट्रात नव्या समीकरणांना जन्म देऊ शकतो, अशी चर्चा सध्या राज्यभर गाजत आहे.




















