महाराष्ट्र

१७ दिवसांपासून सुरू असलेले आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित; सरकारकडून मागण्या मान्य करण्याचे आश्वासन

पुणे | प्रतिनिधी

विविध मागण्यांसाठी मागील १७ दिवसांपासून सुरू असलेले आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आदिवासी विद्यार्थी प्रतिनिधींसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असून, संबंधित मागण्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पुणे येथील आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांशी मंत्री अशोक उईके यांनी संवाद साधला.

यावेळी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना फळांचा रस देऊन त्यांचे उपोषण सोडविण्यात आले. सरकार आदिवासी विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, त्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे उईके यांनी स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करावे, अशी विनंतीही त्यांनी केली.

सरकारच्या सकारात्मक भूमिकेला प्रतिसाद देत आदिवासी विद्यार्थी प्रतिनिधींनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

“पालक म्हणून आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी सरकार कायम त्यांच्या सोबत राहील,” असे अशोक उईके यांनी यावेळी सांगितले.

What's your reaction?